
अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपये किंमतीचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी रुपये असून, या कारवाईत एक कोटी १० लाख रुपयांची रोकड व १८६ ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईतील डोंगरी परिसरात एनसीबीच्या पथकाने आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या छाप्यात २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून त्याबरोबरच १८६.६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १ कोटी १० लाख २४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी एन. खान, ए. अली आणि ए. एफ. शेख नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
डोंगरी परिसरात आंतरराज्य अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक रॅकेट सक्रीय असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्याआधारे एनसीबीने सापळा रचला. ए. अली याच्याकडून ३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन. खानच्या घराची झडती घेतली असता आणखी २ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन. खानने चौकशीदरम्यान एएफ शेख नावाची डोंगरी येथील महिला ड्रग्सचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली.
एनसीबीच्या पथकाने संबंधित महिलेच्या घराची झडती घेतली असता१५ किलो मेफेड्रोन सापडले. त्याचबरोबर १ कोटी १० लाख २४ हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने सापडले. ड्रग्जच्या तस्करीतून इतकी संपत्ती जमवल्याचे आढळून आले. या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या
