Pune Naxal : पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर माओवादी चळवळीत ओढला गेलेला तरुण संतोष वसंत शेलार उर्फ पेंटर हा पुणे पोलिसांना शरण आला असून तो आत्मसमर्पण करणार आहे. शेलार हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असून तो पुण्यात आला होता. शेलारला माओवाद्यांमध्ये शेलार पेंटर या नावाने ओळखले जाते. तो नक्षली कमांडर देखील झाला होता. शेलार (वय ३३) हा मूळचा भवानी पेठेतील कासेवाडी येथील रहिवासी आहे. तो २०१० पासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी तो हरवला असल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दिली होती. सध्या त्याला ससुनमध्ये भरती करण्यात आले असून त्याच्यावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक निगरानी ठेवून आहे.
संतोष शेलार हा ७ नोव्हेंबर २०१० पासून बेपत्ता होता. पुण्यात अंजला सोनटक्केने माओवादी विचारधारेचा प्रसार करून काही तरुणांना जाळ्यात ओढल्याचा आरोप असून त्यातील संतोष शेलार हा एक असल्याची माहिती आहे. संतोष आणि आणखी एक तरुण हे दोघे पुण्यातील ताडीवाला रस्ता येथून बेपत्ता झाले होते. संतोष हा कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्कात आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.
गडचिरोलीच्या दुर्गम भागात शेलार माओवादी संघटनेसाठी काम करत होता. तो माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होता. गडचिरोली, भामरागड परिसरात पोलिसांच्या पथकावर हल्ले झाले होते. गडचिरोली, भामरागडसारख्या दुर्गम भागात शेलार गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करत होता.
संतोषने छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात अनेक कारवाया केल्या आहेत. येथील नक्षलविरोधी पथकाने तांडा एरिया कमिटीमध्ये २०१९ मध्ये वॉन्टेड माओवाद्यांची यादी जाहीर केली होती. यात त्याचे नाव होते. संतोष हा नक्षलवाद्यांच्या घातक पथकात सहभागी होता. तो २०१४ मध्ये कमांडर झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.