Nawab Malik vs Abu Azmi : प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेणारे माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी त्यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी चालवली आहे. पक्षानंही त्यांना त्यासाठी संमती दिल्याचं समजतं.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिक यांना दाऊदशी कनेक्शन व भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात अटक झाली होती. अलीकडंच त्यांना जामीन मिळाला आहे. सुटकेनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक हे सध्या अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार आहेत. हा मतदारसंघ ते आता मुलगी सना शेख हिच्यासाठी सोडणार आहेत. मलिक स्वत: अबू आसिम आझमी यांच्या विरोधात मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून लढणार आहेत.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून लढण्याचा मलिक यांचा निर्णय अनेकार्थांनी धाडसी मानला जात आहे. कारण, या मतदारसंघातून अबू आझमी हे तीन वेळा निवडून आले आहेत. या भागात त्यांचं राजकीय वर्चस्व आहे. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी लाट असताना व काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढलेले असतानाही आझमी यांनी ही जागा सहज जिंकली होती. मागील निवडणुकीत त्यांनी २५,६१३ च्या मताधिक्यानं निवडणूक जिंकली होती.
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. इथं सुमारे ५८ टक्के मुस्लिम मतदार आहेत, तर मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि दलिताची संख्या ४२ टक्के आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मलिक हे आझमी यांच्यासाठी आव्हान ठरणार असं मानलं जात आहे.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबतच्या महायुतीत सहभागी झाला आहे. मात्र, त्यांना आपली धर्मनिरपेक्ष ही ओळख टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळं अजित पवार यांनी जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबईतील शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व हे मतदारसंघ आहेत. वांद्रे पूर्वमधून राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकी असतील, हे निश्चित मानलं जात आहे.
अबू आझमी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण गेल्या १५ वर्षांत केलेल्या कामावर माझा विश्वास आहे. अजूनही मी निवडणूक लढवावी असं वाटतं का, असं मी जनतेला विचारेन. लोकांनी नाही म्हटलं तर मी लढणार नाही. पण, जातीयवादी पक्षांशी संबंधित नसलेल्या एखाद्या चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याला माझं प्राधान्य असेल. अनेक दिवसांपासून ते माझी जागा हिसकावून घेण्याचा बेत आखत होते. महाराष्ट्र विधानसभेत अल्पसंख्याकांचा आवाज उठवणारा कोणीतरी जिंकावा, अशी माझी इच्छा आहे, असं ते म्हणाले.
नवाब मलिक हे अनेक वर्षे समाजवादी पक्षात होते. १९९६ आणि १९९९ मध्ये त्यांनी नेहरूनगर मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवला आणि १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांच्याकडं कामगार खातं सोपवण्यात आलं होतं.