मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार?; कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार?; कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 09, 2022 09:34 AM IST

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द व्हावा या मागणीसाठी सरकारी पक्ष न्यायालयात जाणार आहे.

खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची जामीनावर सुटका झाली आहे. हनुमान चालिसा वादावरून त्यांना अटक झाली होती. त्यानतंर न्यायालायने जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष न्यायालयात जाणार आहे. राणा यांनी न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. त्यांचा जामीन रद्द व्हावा अशी मागणी करण्यासाठी सरकारी पक्ष न्यायालयात जाणार आहे.

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यावेळी बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाने राणा दाम्पत्याला मनाई केली होती. तरीही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माध्यमांशी बोलत काही वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे जामीन रद्द व्हावा यासाठी न्यायालयात जाणार असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

जामीन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा हनुमान चालिसावरून वक्तव्य केलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. राणा यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचं दिसत असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?
हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवा, मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढेन, इतकंच नव्हे तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचंही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.

हनुमान चालिसा प्रकरणावरूनही त्यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे. सरकारने केलेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे. मला १४ दिवस काय १४ वर्षे जरी तुरुंगात ठेवले तरी मी रहायला तयार आहे. मी अशी काय चूक केली की मला ही शिक्षा दिली गेली. हनुमान चालिसा वाचणे, भगवान श्रीरामाचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर जितके दिवस तुरुंगात ठेवतील तितके दिवस रहायला तयार आहे.

IPL_Entry_Point