दसरा दिवाळीच्या सणानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मतदारसंघातील गावागावात शिधा वाटप केले होते. आता रंगपंचमीच्या सणानिमत्ताने महिलांना साड्यांचे वाटप केले आहे. मात्र, नुकत्याच राणा यांनी वाटलेल्या साड्या खराब आणि खुपच हलक्या दर्जाच्या असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. आज नागरिकांच्या गाठीभेटीसाठी आलेल्या राणा यांना महिलांनी घेरलं व याबाबत त्यांना जाब विचारला. तसेच काँग्रेसनेही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वूभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांच्या गाठीभेटी तसेच मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. त्यावेळी स्थानिक लोकांनी त्यांना घेरलं व दिलेल्या साड्या अतिशय खराब असून त्या देण्यापेक्षा न दिलेल्या चांगल्या असे म्हणत संताप व्यक्त केला. यावेळी राणा यांनी लोकांची समजूत घालताना म्हटले की, कंपनीतूनच तशा साड्या आल्या आहेत. याबाबत मतदारसंघातील दोन-तीन गावांतून तक्रारी आल्या आहेत. पुढच्या वेळेस चांगल्या दिल्या जातील.
मात्र लोकांचे यामुळे समाधान झाले नाही, त्यांनी आत्ताच साड्या बदलून देण्याची मागणी केली. साड्या बदलून देण्याची मागणी करताना लोकांचा आवाज व्हिडिओत ऐकायला मिळत आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून याबाबत राणांना जाब विचारला आहे. तसेच, मोदींनी या साड्या दिल्या असतील तर, या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात जवळपास २ लाख साड्यांचे वाटप केले आहे. या साड्या पंतप्रधान मोदींनी वाटल्याचं राणा सांगत आहेत. जर २०० रुपयांप्रमाणे २ लाख साड्या वाटल्या असतील तर याची किमंत चार कोटी रुपये होते. जर चार कोटी प्रमाणे प्रत्येक मतदार संघात वाटल्या असतील तर हा आकडा विचार करण्यासारखा आहे. हा पैसा पंतप्रधान मोदी किंवा भाजपचा असेल. मग आता या पैशाचा हिशोब तर भाजपला आणि मोदींना द्यावाच लागेल ना?