NMMC News: नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून तीन वेळा पाणीकपात जाहीर केली आहे. नवी मुंबईकरांना आजपासून आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा केला जाणार नाही. तर, सकाळी नियमित पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी वाचवावे आणि अपव्यय टाळावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
मोरबे धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मोरेबे धरणात आता एकूण क्षमतेच्या २६ टक्के पाणीसाठा झाला शिल्लक आहे, जो फक्त पुढील ४० दिवसांसाठी पुरेल. शनिवारपर्यंत पाण्याची उंची ६९.३३ मीटर होती आणि पाणीसाठा ५० दशलक्ष घनमीटर आहे, असे असले तरी पाण्याची पातळी गेल्या वर्षी १५ जून इतकीच आहे.
गेल्या महिन्यात एनएमएमसीने आठवड्यातून दोनवेळा पाणीकपात लागू केली होती. परंतु, अत्यल्प पाऊस आणि मर्यादित साठ्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने यात अतिरिक्त एका दिवसांची भर घातली. म्हणजेच आता आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद असेल.
एनएमएमसीचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे म्हणाले की, 'मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अपुरा पाऊस झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठा भरण्यासाठी पुरेसा पाऊस होईपर्यंत सकाळचा पाणीपुरवठा नियमित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिंदे यांनी पाणी बचतीसाठी एनएमएमसीने केलेल्या अनेक उपाययोजनांवर प्रकाश टाकला. पाण्याचा अपव्यय आणि अतिवापर वाढल्याने नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. पिण्याचे पाणी बागा आणि दुभाजकांसाठी वापरले जात आहे. तसेच बेकायदा पाणी जोडण्यांवर कारवाई केल्याने दररोज २७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत झाली आहे. पाण्याचा कोटा ओलांडणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती चिंताजनक नाही, पण सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे ठरेल, असे शिंदे म्हणाले.