Navi Mumbai Kharghar Rape: नवी मुंबईच्या खारघर येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. एका ३७ वर्षीय विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून खारघर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेरुळमधील सारसोळे गावातील रहिवासी आहे. तर, पीडित महिला खारघरमधील एका वित्तीय कंपनीत काम करते. आरोपीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पीडितेशी मैत्री केली. त्यानंतर कामानिमित्त भेटीतून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. यादरम्यान आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो काढून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या शारीरिक त्रासाला वैतागून पीडिताने त्याच्याशी मैत्री संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला भेटण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले.
यानंतर पीडित महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे, खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अकोला जिल्ह्यात २१ वर्षीय तरुणीला जबरदस्ती घरातून उचलून नेऊन तीन महिने अत्याचार केल्याची संताजनक घटना समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अत्याचार करणाऱ्या आरोपींवर ३६३, ३७६, (२) (N), ३७७, ३२३, ५०६ आणि ३४ काद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल करून १३ दिवस उलटले असून अद्याप आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने पीडिताने जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर कैफियत मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ५ डिसेंबर २०२३ रोजी शौचालयाला जात असताना आरोपींनी पीडिताचे अपहरण करून अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील खोलीत नेले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी आरोपीने तिचे अश्लील फोटो काढले. या फोटोंद्वारे तिला ब्लॅकमेल करत आरोपींनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. २६ मार्च २०२४ पर्यत हा सर्व प्रकार सुरूच होता, असे पीडिताने आपल्या तक्रारीत नमूद केले.
संबंधित बातम्या