Navi Mumbai Murder: नवी मुंबईत पत्नीशी झालेल्या वादातून एका व्यक्तीने पोटच्या पाच महिन्यांच्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली. ही घटना रविवारी (९ जून २०२४) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशीराम ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीचे अमृता हिच्यासोबत गेल्यावर्षी लग्न झाले असून हे दोघेही उरण येथील बोकडविरा येथे राहत होते. प्रेमविवाह करणाऱ्या या जोडप्याला पाच महिन्यांपूर्वी पहिली मुलगी झाली. आरोपी दारुड्या असून कामावरून घरी आल्यानंतर बहुतेक दिवस पत्नीला मारहाण करत असे. मजूर म्हणून काम करणाऱ्या ठाकूर यांनी रविवारी रात्रीही असेच केले. रात्री अकराच्या सुमारास तो दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण वाढू नये म्हणून अमृता ही तिच्या घरापासून जवळच असलेल्या तिच्या पालकांच्या घरी गेली. त्यानंतर आरोपीही अमृताच्या पाठोपाठ तिच्या घरी गेला आणि तिच्याकडून पाच महिन्यांच्या मुलीला हिसकावून जमिनीवर फेकून दिले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी दारून पिऊन घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीशी वाद घालू लागला. यानंतर आरोपीच्या पत्नी आपल्या मुलीला घेऊन २० घरांच्या अंतरावर असलेल्या तिच्या माहेरी गेली. काळी वेळाने आरोपीही तिथे गेला आणि त्याने पत्नीशी भांडण सुरू केले. पत्नीने त्याच्यासोबत घरी येण्यास नकार देताच आरोपीने तिच्या हातातून मुलीला हिसकावले आणि तिला जमिनीवर फेकले. यानंतर मुलीच्या पालकांनी आरोपीला घरात कोंडून ठेवले आणि मुलीला जखमी अवस्थेत उरण येथील स्थानिक रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला आज न्यायालयात हजर केले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिलेचे नातेवाईक करत आहेत.
संबंधित बातम्या