किरकोळ वादातून अनेकदा मोठ्या गुन्हेगारी घटना घडतात. अनेकदा क्षुल्लक कारणावरून हत्य़ेच्या घटना घडतात. रागाच्या भरात कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा टाकण्याच्य़ा वादातून शेजाऱ्याने ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात बाळ गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगावर काटा आणणारी घटना नवी मुंबईतील बेलापूरमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर गावाच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील झोपडपट्टीमध्ये ही घटना घडलेली आहे. दारासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद इतका विकोपाला गेला की, या भांडणांतून ९ महिन्याच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. बाळाच्या कपाळवार मध्यभागी सरळ वार झाला आहे. बाळ गंभीर जखमी झाले असून प्रचंड रक्तस्त्राव झाला.
बाळावर वार करणारा आरोपी फरार असून त्याच्याविरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या नऊ महिन्याच्या बालकावर सध्या उपचार उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती असून बाळावर वार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.