Navi Mumbai And Panvel Updates: नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई आणि पनवेल येथील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नवी मुंबई आणि पनवेल हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नेमके काय झाले? हे समजून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काही तास लागले.
नवी मुंबई आणि पनवेल परिसरात रविवारी सकाळी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर येऊन नेमके काय झाले? याची चौकशी केली.
वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ०९.५४ वाजताच्या सुमारास नवी मुंबई आणि पनवेलजवळ १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, कोणताही मोठी जीवितहानी झाली नाही.