Navi Mumbai Pick-Up Van Accident News: नवी मुंबईतील खारकोपर गावात एका पिकअप व्हॅनने चार वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली. मयत मुलगी आपल्या आईसोबत डॉक्टरांकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
सावन खनामिया सिंगदिवाल असे अटक करण्यता आलेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन हा पिकअप व्हॅन घेऊन खारकोपर गावातून उलवे येथील सेक्टर ८ मध्ये जात होता. त्यावेळी सावनने गाडी मागे घेतली असता आईचा हात सोडून तिच्या मागे चालत असलेल्या चिमुकलीला धक्का बसला आणि ती गाडीच्या पाठच्या चाकाखाली चिरडली गेली.
उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आपल्या आईसह डॉक्टरांकडे जात होती. आपली मुलगी मागे असल्याची आईला माहिती नव्हती. तर, पिकअप व्हॅन चालकाने गाडी रिव्हर्स घेताना पाठी बघितले नाही, त्यामुळे हा अपघात घडला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नवी मुंबईत रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २९७ जण जखमी झाले आहेत. वर्षभरात वाहतूक पोलिसांनी ८ लाख ८७ हजार ७७० वाहन चालकांविरोधात खटले नोंदवले. या कारवाईत पोलिसांनी वाहन चालकाकडून १८ कोटी १९ लाख दंड वसूल केला. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघाताचे आणि मृतांचे प्रमाण अधिक आहे. नवी मुंबईत २०२३ मध्ये २४३ जणांचा अपघाती मृत्यू झाला.
संबंधित बातम्या