Panvel Crime News: पनवेलमध्ये १२ वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याप्रकररणी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सहा महिन्यापूर्वी आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी बालविवाह केला. त्यानंतर आरोपीने पीडितावर वारंवार अत्याचार केले. वैद्यकीय तपासात पीडिता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी केलेल्या पाहणीदरम्यान पनवेल येथील स्थानिक डॉक्टरांना मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. यासंदर्भात माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपी तरुणाविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
भारतात विवाहसाठी मुलीची किमान वय १८ आणि मुलाचे किमान वय २१ असणे बंधनकारक आहे. दरम्यान, १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्याला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बालविवाह झाल्यास संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा ते या विवाहात सामील होते, अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.