Navi Mumbai News: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलीची अश्लील फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग महेश मोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर येथील रहिवाशी असून पूर्वी तो खांदेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता, जिथे पीडित मुलगी देखील शिकत होती. पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. परंतु, पीडिताचे इतर मुलांशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी तिच्यावर अत्याचार करत असे. काही दिवसांपूर्वी आरोपी सोलापूरला निघून गेला. त्यानंतर पीडिताने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले.
मात्र, प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून आरोपीने इंस्टाग्रामवर दोन बनावट अकाऊंट बनवले पीडिताचे अश्लील फोटो शेअर केले. एवढेच नव्हेतर आरोपीने वेगवेगळ्या व्हॉट्सॲप नंबरचा वापर करून पीडिताच्या वडिलांना आणि काकांनाही तिचे फोटो पाठवले. याप्रकरणी पीडिताने आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली. पीडित मुलगी आई- वडिलांसोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी देवरी तालुक्यातील एका गावात गेली होती, तिथे एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले.मुलगी कुठेच दिसत नसल्याने आई- वडिलांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी एक मुलीचा मृतदेह जवळच्या जंगलात आढळल्याचे त्यांना समजले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात हत्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या