Lok Sabha Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. तर, ४ जून मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातही यंदा ५ टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेले एनडीएचे सरकार यंदा ४०० जिंकणार असल्याचा दावा त्यांच्या पक्षातील नेते मंडळी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टोला लगावला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला २०० जागा जिंकणे देखील कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी तसेच आपला आत्मविश्वास किती मोठा आहे, हे दाखवण्यासाठी भाजपने "अब की बार ४०० पार" अशी घोषणा दिली. पण, त्यांची ही घोषणा त्यांच्यातच आरपार घुसली. त्यामुळे ते परत लाईनवर आले अन् आता घोषणा देताहेत, "फिर से एक बार, मोदी सरकार" मात्र, त्यांची ही घोषणाही फोल ठरणार असून नवीन घोषणा येणार आहे ...अब नही जायेंगे , २०० पार".
आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पराभूत करण्यासाठी भारतातील दोन डझनहून अधिक राजकीय पक्षांनी मागच्या वर्षी जुलैमध्ये एका आघाडीची स्थापना केली. यात काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, जनता दल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), समाजवादी पक्ष, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लीम लीग, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, विदुतलाई चिरुतैगल कत्छी, आम आदमी पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस, मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, कोंगुनाडू मक्कल देसिया कत्छी, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोक दल, अपना दल, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स-लेनिनिस्ट लिबरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मणितनेया मक्कल कत्छी, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि शेकाप पक्षांचा समावेश आहे.
यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले.
संबंधित बातम्या