राष्ट्रीय वाचन दिन: पठतु भारतम्, वर्धताम् भारतम्" ही वाचनाच्या परिवर्तनक्षम शक्तीची आठवण करून देणारी व्यापक राष्ट्रीय मोहीम देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. मीनाक्षी लेखी आणि वाचन प्रशिक्षक रीता राममूर्ती गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मोहीम सर्व वयोगटांत लोकप्रिय ठरली.
रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण रिलेशन्स मूव्हमेंट अंतर्गत ज्ञान की फिट की या स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला भक्कम पाठिंबा दिला. एकत्रितपणे त्यांनी ही वाचन चळवळ २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचवली. या भागांत गुजरात, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, ओडिशा, नागालँड, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, केरळ, झारखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, जम्मू-कश्मीर व लडाख यांचा समावेश आहे.
मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १५० विद्यार्थ्यांनी दुपारी १ ते २ या वेळेत सामूहिक वाचन केले. यावेळी वाचन प्रशिक्षक रीता राममूर्ती गुप्ता उपस्थित होत्या. त्यांनी बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, SIES ग्रुप ऑफ कॉलेजेस आणि किताबखाना या प्रसिद्ध पुस्तक विक्री केंद्रालाही भेट दिली. अनेक खासगी आणि महापालिकेच्या शाळांनीही वाचन दिन साजरा केला.
दिल्लीतील IGNCA, जनपथ येथे आयोजित पुस्तक चर्चासत्रात मीनाक्षी लेखी सहभागी झाल्या. माजी परराष्ट्र आणि सांस्कृतिक राज्यमंत्री लेखी म्हणाल्या, “सतत पुस्तकांच्या ऐवजी स्क्रीन स्क्रोल करणाऱ्या सवयींमुळे आपल्या लक्ष केंद्रीकरण क्षमतेवर मोठा परिणाम होत आहे. हे आपल्या खोल काम करण्याच्या आणि दूरदृष्टीने विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहे. यामुळे समाजात अर्थपूर्ण संवाद आणि प्रगती अडचणीत येत आहे. आपण वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.”
NGMA च्या संचालक निधी चौधरी म्हणाल्या,"वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही NGMA ची जबाबदारी आहे. लेखक म्हणजे शब्दांतून अभिव्यक्त होणारे कलाकार. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचं कर्तव्य आहे."
रीता राममूर्ती गुप्ता यांनी सांगितले, "आजचा प्रतिसाद थक्क करणारा आहे. सकाळी ५ पासून देशभरातून विविध वाचन उपक्रमांचे फोटो आणि माहिती माझ्या इनबॉक्समध्ये येत आहेत. माझ्यासाठी वाचन म्हणजे संस्कृती आहे. आपण जितकं वाचकांचं सन्मान करू, तितकी वाचन संस्कृतीची व्याप्ती वाढेल. पठतु भारतम्, वर्धताम् भारतम् या मोहिमेद्वारे आम्ही भारताचे 'लायब्ररी मॅन' पी.एन. पणिक्कर यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #VancheGujarat उपक्रमाला मानवंदना देत आहोत."
हेमा मालिनी, अनिल कपूर, सैयामी खेर, राकेश ओमप्रकाश मेहरा, सोनाली कुलकर्णी, दिव्या दत्ता आणि स्वरूप रावल या सारख्या अनेक नामवंत कलाकारांनी वाचन दिनाच्या संदेशाला पाठिंबा दिला आणि ‘पठतु भारतम्, वर्धताम् भारतम्’ च्या विचारांना बळ दिले.
संबंधित बातम्या