नाशिक – स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालय येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार होते. त्यापूर्वी बहीण-भावाने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे खळबळ माजली. भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराच्या निषेधार्थ नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करणाऱ्या बहीण भावाने आज स्वातंत्र्यदिनी आत्महदहनाची तयारी केली होती. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
योगेश खताळ व त्यांची बहीण अश्विनी खताळ अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या बहीण-भावाचे नाव आहे. ते चांदवड तालुक्यातील शिंगवे मातोबाचे गावचे रहिवाशी आहेत. गावातील वडिलोपार्जित जमीन गमविल्यामुळे त्यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून उपोषण सुरू आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे आपली जमीन हिरावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात निवेदने देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, आज सकाळी योगेश खताळ हे पेट्रोलच्या साह्याने आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि दोघा बहिण-भावाला ताब्यात घेतले आहे.