Nashik Viral Video: देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेले असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पण नाशिक येथील एका महिलेने देशभरातील महिलांना नवा आदर्श घडवून दिला. रस्त्यावरून जाताना मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना या महिलेने चांगलाच चोप दिला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर महिला आणि मुलींची छेड काढत असल्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान, संबंधित महिला आपल्या मुलीसह तेथून जात असताना काही तरुणांनी तिची छेड काढली. यानंतर महिलेने तरुणांना याबाबत जाब विचारला. परंतु, त्यांनी हुज्जत घालण्यास सुरवात केली. मात्र, यामुळे संतापलेल्या महिलेने रुद्रावतार धारण करत मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप दिला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.
साताऱ्यात महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. महिला किंवा मुलींची छेडछाड करताना सापडल्यास संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सक्त सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. महिलांच्या सुरक्षतेसाठी जिल्ह्यात सर्व बस, रिक्षा, वडाप यामध्ये क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
नाशिकरोड येथे काही दिवसांपूर्वी छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच लग्न करण्यासाठी तिला मानसिक त्रास दिला. परंतु, हा त्रास वाढल्याने पीडिताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.