शिर्डी : आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघे ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सिन्नरच्या पूर्व भागात मध्यरात्री घडला.
धरमसिंग गुसींगे, राजेंद्र राजपूत या दोघांचा मृत्यू झाला असून भरतसिंग परदेशी, नंदिणी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विकासाचा महामार्ग असणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आठ दिवसांपूर्वी शिर्डी ते भरवीर या दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गावर मुंबईकडून शिर्डीकडे कार मधून एक परिवार जात होते. दरम्यान, कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळली. यामुळे कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात कार मधील दोघे ठार झाले आहेट. तर दोघे जण जखमी झाले आहेत.
अपघाताची महिती कळताच महामार्गावरील रेस्क्यू पथक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना कोपरगाव येथील रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा रस्ता सुरू झाल्यावर हा पहिलाच अपघात आहे.