नाशिक : शेतकऱ्याचे उत्पन्न डोळ्यात खुपले.. टोमॅटोने लगडलेली झाडे केली जमीनदोस्त
Nashik news : अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास काठीच्या सहाय्याने झाडांना झोडपून रानात अक्षरक्ष: टोमॅटोचा सडा पाडला होता.
सध्या टोमॅटोच्या वाढलेल्या दराने ही भाजी सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत तर तेलंगाणात टोमॅटोची राखण करत असलेल्या शेतकऱ्याची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. अनेकांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाउंसरची नियुक्ती केली होती. यानंतर आता नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील मानरी गावात एका शेतकऱ्याच्या रानातील टोमॅटो अज्ञात व्यक्तीने तोडून नासधूस केल्याची घटना घडली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील मानरी येथील शेतकरी तानाजी शेळके यांच्या शेतातील टोमॅटोची नासधूस करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास काठीच्या सहाय्याने झाडांना झोडपून रानात अक्षरक्ष: टोमॅटोचा सडा पाडला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पिकांवर औषध फवारणीसाठी गेले असता शेतकरी तानाजी शेळके यांना हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी येवला तालुका पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तानाजी शेळके यांनी महागडी औषधे फवारणी करून टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतले. त्याला दरही चांगली मिळत असल्याने शेळके समाधानी होते. मात्र आज औषध फवारण्यासाठी गेले असता टोमॅटोच्या सरीत तोडून टाकलेले टोमॅटो पासून त्यांना धक्का बसला. रानातील दोन ते तीन सऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो तोडून टाकल्याचे दिसून आले.
अज्ञात व्यक्तीने काठीने झाडांवर वार केल्याने झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.
विभाग