मालेगाव : राहुल हे गांधीही नाही अन् सावरकरही, ते ओरिजनली खान असून त्यांनी महात्मा गांधीचे वंशज नसतांना देखील त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला. आताचे गांधी म्हणजे फिरोज खान यांची पुढची पिलावळे असून राहुल गांधी यांचे मूळ नाव 'खान' असल्याची घणाघाती टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली. पोंक्षे यांच्या या टीकेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिना निमित्त मालेगाव येथे तिरंगा रॅलीसह सावरकरांच्या जीवनावरील शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या आडनावाचा समाचार घेत त्यांच्यावर जहरी टीका केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.
पोंक्षे म्हणाले. राहुल हा एक तर गांधी नाही आणि सावरकरही नाही. हे काही ओरिजनल गांधी नाही. ते मूळचे खान आहे. ते महात्मा गांधीचे वंशज नसून त्यांनी केवळ त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला आहे. आताचे गांधी हे फिरोज खान यांची पुढची पीलावळे आहेत. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? राफेल प्रकरणात सुद्धा यांना तोंडघशी पडावे लागले. या प्रकरणी सुप्रिम कोर्टात त्यांना माफी मागावी लागली. सावरकर यांच्यावर टीका केल्यावर देखील त्यांना माफी मागावी लागली होती, असे देखील पोंक्षे म्हणाले.
दरम्यान, मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक पुन्हा रंगमंचावर येणार आहे, अशी माहिती पोंक्षे यांनी दिली. या नाटकाला होणारा विरोध झुगारून या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय पोंक्षें यांनी घेतला आहे. शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर या बाबत व्हिडीओ शेअर करत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.