मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

May 21, 2024 10:35 PM IST

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावली धरणाच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथे फिरायला आलेल्या २ तरुण व ३ तरुणी अशा पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.

भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू
भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरीमध्ये भावली धरणावर फिरण्यासाठी आलेल्या ५  जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये २ तरुण आणि  ३  तरुणींचा  समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावली धरणाच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. आज भावली धरण परिसरात २ तरुण व ३ तरुणी असे पाच जण रिक्षा घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर यामधील काही जणांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. एकापाठोपाठ एक सर्वजण पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा  अंदाज न आल्यामुळे पाचही जण बुडू लागले. परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळून शकली नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. यामध्ये काही जण अल्पवयीन आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी नागरिक मदतकार्यासाठी पुढे आहे. त्यांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. धरणात बुडून ५ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनस खान दिलदार खान (१५वर्षे), नाझिया इमरान खान (१५ वर्षे), मिजबाह दिलदार खान (१६ वर्षे ), हनीफ अहमद शेख (२४ वर्षे) आणि ईकरा दिलदार खान (१४ वर्षे) अशी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली असून. या घटनेने खान आणि शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उजनी धरणात बोट पलटली, ६ जण बुडाल्याची भीती

भीमा नदी पात्रात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बोट बुडाल्याने सहा जण पाण्यात बुडाले आहेत.  उजनी धरण पात्रात सायंकाळच्या सुमारास वादळी वारे सुटले होते. यावेळी प्रवाशाची वाहतूक करणारी बोट बुडाली. बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे जात होती. बोट पलटी झाल्याने यामध्ये ६ जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. यातील एकाने पोहत आपला जीव वाचवला. 

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग