नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे मंगळवारी भावली धरणात बुडून तीन तरुणींसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता इगतपुरीमधीलच मुंढेगावात अशीच ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. विहिरीत पाय घसरून पडलेल्या आपल्या ३ वर्षांच्या मुलीला वाचवताना मुलीसह आईचाही बुडून मृत्यू झाला आहे.
मायलेकी जवळच असलेल्या शेनवड खुर्द येथील रहिवाशी असून ग्रामस्थांनी मायलेकीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ वर्षीय महिला पाणी आणण्यासाठी आपल्या ३ वर्षांच्या मुलीला घेऊन शेतातील विहिरीकडे गेली होती. मुलीला विहिरीत बाजूला ठेवून ही महिला विहिरीतून पाणी उपसत होती. त्यावेळी मुलगी विहिरीच्या काठावर आली व पाय घसरून विहिरीत पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे पाहताच महिलेने जीवाच्या आकांताने विहिरीत स्वत:ला झोकून दिलं. त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. यामुळे दोघींचाही विहिरीतीही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
महिला विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेतातील या विहिरीकडे धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मायलेकींचे मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरीमध्ये भावली धरणावर फिरण्यासाठी आलेल्या ५ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये २ तरुण आणि ३ तरुणींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावली धरणाच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. आज भावली धरण परिसरात २ तरुण व ३ तरुणी असे पाच जण रिक्षा घेऊन फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर यामधील काही जणांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. एकापाठोपाठ एक सर्वजण पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाचही जण बुडू लागले. परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळून शकली नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. यामध्ये काही जण अल्पवयीन आहेत.
संबंधित बातम्या