नाशिकमध्ये मूल होत नाही म्हणून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या पत्नीने आपल्या दोन भावांच्या मदतीने पतीचा काटा काढला. पती पहिल्या पत्नीकडेच रहात असल्याने आपल्याला मुलबाळ होत नसल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मृत व्यक्ती नाशिकच्या आडगाव-सय्यद पिंप्री रस्त्यावरील एका वस्तीवर खेळणी विकायचा. दुसऱ्या पत्नीने दोन सख्ख्या भावांच्या मदतीने पतीला मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भावसार मूलचंद पवार उर्फ बाल्या असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह तिच्या भावांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पत्नीला ताब्यात घेतलं आहे तर अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. नाशिकमधील हिंदुस्तान नगर येथील सिल्व्हर ओक हाऊसमागे ही घटना घडली आहे.
पत्नी सुनिता पवार, भाऊ राज शिंदे, आदित्य शिंदे (दोघे रा. हिंदुस्तान नगर, आडगाव) तसंच दीपक आणि अन्य एका अनोळखी संशयितांनी ही हत्या केली आहे. भावसार याची पहिली पत्नी निरमा पवार (वय ३०) हिने याबाबत फिर्याद दिली आहे. भावसार आणि ११ वर्षांची मुलगी आलम हिला घेऊन गुजरातहून आडगाव शिवारातील हिंदुस्तान नगर येथे राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती.
भावसारची दुसरी पत्नी आणि निरमाची सवत सुनिता हिने भावसार याच्याशी लग्न करून अनेक वर्षे झाली तरी मूलबाळ होत नसल्यामुळे सकाळपासून भांडण सुरू केले होते. सुनिताचे भाऊ राज आणि आदित हे बहिणीच्या घरी आले होते. त्यांनीही भाऊजीसोबत वाद घालू लागले. दिवसभर त्यांच्यात वाद सुरू होता. यानंतर संध्याकाळी ७ वाजता अचानक भावसारच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला, त्यानंतर पत्नी निरमा आणि तिच्या कुटुंबाने त्याला मारहाण करायला सुरुवात केली.
पतीच्या ओरड्याच्या आवाज ऐकून पहिली पत्नी निरमा धावत गेली, तेव्हा सुनिता, राज, आदित, त्यांचा नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी व्यक्ती असे पाच जण तिचा पती भावसारला मारहाण करत होते. या सगळ्यांनी मिळून भावसारला मारहाण केली आणि त्याच्या पोटावर, छातीवर आणि पाठीत वार केले. आदितने भावसारच्या डोक्यात रॉड घातला, हा घाव वर्मी लागल्यामुळे भावसार रक्तबंबाळ होऊन पळत पत्नी निरमाजवळ आला, यानंतर निरमा आणि इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं असून उर्वरित चौघेही फरार झाले आहेत, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात सून त्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून रवाना करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या