Nashik flood : पुण्यासह नाशिक जिल्ह्यात देखील रविवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नद्या या दुथड्या भरून वाहत आहेत. गोदावरीनदीला पुर आला असून येथील दुतोंड्या मारुतीमंदिराच्या छताला पाणी लागले आहे. तर दिंडोरीतील पुणेगाव धरण हे ८० टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीला देखील पुर आला असून या पुराच्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेलेले १२ जण अडकून पडले आहेत. नदीला अचानक पाणी वाढल्याने हे सर्व नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवनविस्कळीत झाले आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार सुरू असेलया पावसामुळे जिल्ह्यातील वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे जवळपास भरली आहे. मालेगाव तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून गिरणा नदीला पुर आला आहे. काल रात्री काही जण या नदी पत्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक नदीचे पाणी वाढल्याने हे सर्व जण त्यात अडकून पडले.
ही घटना ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यांनी तातडीने रात्री बचावकार्य राबवण्यास सुरूवात केली. मात्र, उशीर झाल्याने हे बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा बचावकार्य राबावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुरात अडकलेल्यांना काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक देखील बोलावण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी व नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. एनडीआरएफसोबत अग्निशमन दल व नागरिक देखील या बचावकार्यात सहभागी झाले आहेत. हे सर्व १२ जण एका खडकाचा आधार घेऊन थांबले आहे.
नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीला देखील पुर आला आहे. नदीपत्रातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे गोदावरी काठावर जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या गंगापूर धरणातून ८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.