Nashik Accident : नाशिक येथे गुजरात येथून नाशिक येथे अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा पाठलाग करत असतांना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचा एक कर्मचारी ठार झाला. तर दूसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड-मनमाड मार्गावर हरनुल टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली.
कैलास गेनू कसबे (वय ५०, रा. नाशिक) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर राहुल पवार हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर आणखी एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्री घडली. एका वाहनातून गुजरात येथून नाशिक येथे अवैधरित्या मद्यसाठ्याची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार चांदवड-मनमाड मार्गावर सापळा रचण्यात आला होता. मात्र, ही वाहन भरधाव वेगात पुढे गेल्याने उत्पादन शुक्लच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पुढे मागे असा खेळ सुरू असतांना तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला कट मारला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्यावर उलटली. हा अपघात हरनूल टोलनाक्याजवळ घडला. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. तर दरम्यान, मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेची दाखल मंत्री शंभुराजे देसाई यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणयाचे आदेश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या पथकाला विदेशी बनावटीची दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर उत्पादन शुक्लचे अधिकारी या वाहनाचा पाठलाग करत असतांना दुसऱ्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत केली जाईल मात्र, कर्तव्य बजावत असताना कर्मचार्याचा जीव घेणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या आरोपींच्या शोधासाठी पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे शंभुराजे देसाई म्हणाले.
संबंधित बातम्या