Igatpuri Crime: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाने दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस नेमकं कोणती कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवघ्या पंधरा दिवसात दुसरी घटना घडल्याने नाशकात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
आफण अन्सारी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोमांस तस्करीच्या संशयावरून पंधरा जणांच्या जमावाने आफण अन्सारी आणि त्याच्या एका सहकारीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आफण अन्सारीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. तर, त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण प्रकार इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
पंधरा दिवसांपूर्वी देखील इगतपुरी तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. गोमांस तस्करीच्या संशयातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. लुकमान अन्सारी (वय, २३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अन्सारी हा दोन साथीदारांसह ८ जून रोजी त्याच्या टेम्पोतून गुरे घेऊन जात होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सहापूर येथील विहीगाव येथे सुमारे १०-१५ कार्यकर्त्यांनी त्यांचा टेम्पो अडवला. तसेच टेम्पो घाटनदेवीकडे घेण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी अन्सारी आणि त्याच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारीचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु, आरोपींनी अन्सारीला पकडून ठेवले. आरोपी अन्सारीला मारहाण करत असताना खड्यात पडला. मात्र, मारहाणीमुळेच अन्सारीचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या