मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “५० गद्दार मांडीवर बसल्यापासून आमची गरज संपली, ४९ मतदारसंघातील नाराज भाजप नेते शिवसेनेत येणार”

“५० गद्दार मांडीवर बसल्यापासून आमची गरज संपली, ४९ मतदारसंघातील नाराज भाजप नेते शिवसेनेत येणार”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 05:45 PM IST

bjpleaderadvayhirejoinshivsena : ५० गद्दार मांडीवर बसल्यापासून भाजपला आमची गरज राहिली नाही. ४९ मतदारसंघातील भाजप नेत्यांची कुंचबणा होत असल्याचा आरोप करत नाशिकमधील भाजप नेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

भाजप नेते अद्वय हिरे
भाजप नेते अद्वय हिरे

उत्तर महाराष्ट्रातील भाजपने मोठे नेते व नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी भाजपला दणका देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी हिरे यांनी भाजपवर सडकून टीका करताना म्हटले की, राज्यातील जवळपास ४९ मतदारसंघातील नेते नाराज आहेत, लवकरचे ते शिवसेनेत येण्याची घोषणा करतील. 

हिरे म्हणाले की, शिवसेना सोडून नेते जात आहेत. हे चुकीचे आहे. जे गद्दार गेले आहेत, त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी आज भाजपमधून बाहेर पडलोय, पण ४९ मतदारसंघात भाजपाचे नेते थांबले आहेत, ज्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा अद्वय हिरे यांनी केला.

अद्वय हिरे म्हणाले की, दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वात २००९ पासून भाजपसाठी काम करतो.  देशात काँग्रेसची लाट होती त्यावेळी सर्वजण भाजप सोडून जात होते. त्या परिसस्थितीत एका केंद्रीय मंत्र्याला पराभूत करून भाडप उमेदवाराला लोकसभेत पाठवले. स्थानिक पातळीवर सत्ता खेचून आणली. मात्र आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. तेव्हा आंदोलने केली मात्र भाजपने काहीच केलं नाही. त्यामुळे भाजपचा त्याग करत असल्याचे हिरे यांनी सांगितले. शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर केल्यापासून अनेक भाजप नेत्यांचे फोन आले मात्र त्यांना स्पष्ट सांगितले. कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. येणाऱ्या काळात उत्तर महाराष्ट्रात शिवसेना वाढवण्यासाठी काम करू.

WhatsApp channel