Nashik Gandharwanagari News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरेक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना लहान मुलांवरही अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक येथील गंधर्व नगरी येथे ८ वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड परिसरातील गंधर्व नगरी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या डकमध्ये ८ वर्षाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पद आढळून आला. यानंतर नाशिक उपनगर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस तपासात असे समजले की, मयत मुलगा मूकबधिर असून त्याच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार इमारतीच्या सहाव्या मजल्यावर घडला. त्यानंतर त्याला तिथूनच खाली फेकण्यात आले, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी ३ पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असे अश्वासन नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिले. या घटनेने नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या प्रकरणातील दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोकांकडून केली जात आहे.
संबंधित बातम्या