Nashik Aadgaon Accident: नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे भीषण अपघात झाला आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. आयशर टेम्पो हा समोरच्या बाजूने अचानक दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसून समोरून येणाऱ्या ब्रिझा कारवर जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत चौघे हे नाशिकच्या सिडको परिसरातील राहणारे आहेत. टेम्पो हा विरुद्ध दिशेने येत असतांना हा अपघात झाला आहे.
या दुर्घटनेत रहेमान सुलेमान तांबोळी (वय ४८), त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (वय २१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू पठाण (वय ३८, रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (वय २४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे एक आयशर ट्रक हा कोंबड खत घेऊन जात होता. हा ट्रक शुक्रवारी (दि.१२) रात्री ११ च्या सुमारास नाशिक आडगाव मुंबई महामार्गाने विरुद्ध दिशेने जात होता. ट्रकचालकाने दारू प्यायली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अवस्थेत त्याने विरुद्ध दिशेने वेगाने ट्रक चालवत असतांना त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर तोडून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या ब्रिझा कारला जाऊन धडकला. या भीषण अपघातात कार मधील चौघे जागीच ठार झाले. तर ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत.
मृत सर्व जण हे भाजीपाला विक्रेते होते. यामुळे ते देवळा तालुक्यातील सटाणा येथे व्यवहारायसाठी गेले होते. तेथील कामे आटोपून ते घरी परत येत असतांना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
मालेगाव येथे देखील दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगामधील वाके येथे हा अपघात झाला. यात वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली व जावयाचा भीषण अपघात झाला. हे सर्व कारने जात असतांना त्यांची गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवरवर जाऊन धडकल्याने तिघांचाही मृत्यू झाला. मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
संबंधित बातम्या