Gujarat Police Arrested Nanded Youth : नांदेडमधून मोठी बातमी पुढे येत आहे. पाकिस्तानमधील व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधित असणाऱ्या एका युवकाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने या ग्रुपवर देशविघातक कृत्य तसेच देशात अनेक मोठ्या नागरिकांना मारण्याचे प्लॅनिंग आणि घातपात करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
शेख शकील शेख सत्तार (वय १९, नरसी नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला गुजरातमधील सुरत येथील डीसीबी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आहे. या कारवाईत नांदेड पोलिसांनी देखील सहभाग घेतला आहे. शेख सत्तार याचे पाकिस्तानमधील व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंध असून तो या ग्रुपमध्ये देशविरोधात चॅटिंग करत असल्याचे आढळले आहे.
जैश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप वकास आणि सरफराज डोगर हे पाकिस्तानमध्ये राहणारे दोघेजण चालवतात. या ग्रुपमध्ये नांदेड येथील युवकासह गुजरातमधील सुरतमधील सोहेल टिमोल आणि बिहार मधील शहनाज हे दोघे देखील सामील आहेत. या आरोपींनी मिळून सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा, हैदराबादचे राजासिंह, सुदर्शन वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण, नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींनी अनेकांना मारण्यासाठी परदेशातून शस्त्रे खरेदी करण्याबाबत देखील ग्रुपवर चर्चा केल्याचे आढळले आहे. यात आरोपींच्या व्हॉट्सॲप चॅटिंगमध्ये शेख शकील शेख सत्तार हा देखील सहभागी होता. यामुळे गुजरात पोलिसांनी नरसी येथून शेख शकील शेख सत्तार याला अटक केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले की, नरसी येथील १९ वर्षी मुलगा शेख हा पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य असून त्याने देशात घातपात करण्यासंबंधी या ग्रुपमध्ये चर्चा केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी देशविघातक कारवाया करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या