पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (२८ फेब्रुवारी) यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. येथे मोदींच्या उपस्थितीत महिला मेळावा होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी यवतमाळनजीक भारी गावात भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सभामंडपाचे काम सुरू असताना त्यातील एक भाग कोसळल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात जवळपास ५० एकर जमिनीवर हा भव्य मंडप उभारला जात आहे. त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली येऊन क्रेनवर कोसळले. त्यामुळे त्याखाली असलेले कामगार जखमी झाले. जखमींना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंडप उभारणीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीमध्ये सुरू आहे. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी जवळपास तीन लाख महिला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या