narendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  narendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!

narendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!

Jun 06, 2024 07:00 PM IST

Narendra modi : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जादू महाराष्ट्रात अजिबात चालली नसल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

मोदी मॅजिक संपले! महाराष्ट्रात जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!
मोदी मॅजिक संपले! महाराष्ट्रात जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!

राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यापासून सरकार म्हणजे मोदी आणि भाजप म्हणजे मोदी असंच चित्र होते. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका भाजपनं बहुमतानं जिंकल्यानंतर मोदींशिवाय काही होणारच नाही असा समज खुद्द भाजपवाल्यांनीही करून घेतला होता. मात्र, मोदींचा करिष्मा संपल्याचं २०२४ च्या निवडणुकीनं दाखवून दिलं. महाराष्ट्रातील मोदींच्या सभा आणि भाजपच्या कामगिरीची आकडेवारी सर्व काही सांगून जाणारी आहे.

याआधीच्या दोन्ही निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक देखील भाजपनं केवळ मोदींच्या नावावर लढली होती. देशातील अनेक खासदार नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मत द्या, अशीच विनवणी मतदारांना करत होते. खुद्द नरेंद्र मोदी हे त्यांच्या सभांमध्ये ‘मोदीने तुमको ये दिया…’ ‘मोदीने तुमको वो दिया…’ असं म्हणत होते. त्यांच्या भाषणात भाजप किंवा एनडीए सरकार असा उल्लेख नसायचा. मोदी यांच्या देशभर शेकडो सभा झाल्या.

एकट्या महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या १८ सभा झाल्या. त्याशिवाय रोड शो झाला. मात्र, त्याचा कोणताही प्रभाव मतदारांवर पडल्याचं दिसलं नाही. महाराष्ट्रात भाजपच्या अवघ्या ९ जागा निवडून आल्या. जिथं नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या, त्यापैकी सातारा, कल्याण व पुणे वगळता इतर मतदारसंघातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला. मुंबईतील शिवाजी महाराज पार्कवरही पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मात्र, मुंबईत महायुतीला फारसं यश मिळालं नाही. उलट २०१९ ला निवडून आलेल्या मुंबईतील दोन जागा भाजपनं गमावल्या.

मोदींच्या सभा आणि निकाल

बीड

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी इथं सभा घेतली होती. मात्र, इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला.

नांदेड

काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हा जिल्हा. भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी इथं मोदींची सभा झाली. मात्र, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी चिखलीकरांना धूळ चारली.

चंद्रपूर

राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातही मोदींची सभा झाली. मात्र, ही सभा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय रोखू शकली नाही. मुनगंटीवार यांचा तब्बल २,६०,४०६ मतांनी पराभव झाला.

सोलापूर

सोलापुरातही मोदींच्या सभेचा फारसा उपयोग झाला नाही. भाजप उमेदवार राम सातपुते यांचा इथं पराभव झाला. काँग्रेसच्या तरुण नेत्या प्रणिती शिंदे यांनी इथं बाजी मारली.

कोल्हापूर

कोल्हापुरात शिंदे गटाचे संजय मंडलिक हे निवडणूक लढवत होते. तिथंही मोदींची सभा झाली. मात्र, तिथं काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

रामटेक

काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले राजू पारवे यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. मात्र, तिथंही काँग्रेसचे शामकुमार बर्वे जिंकले.

वर्धा

वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस यांच्यासाठी नरेंद्र मोदी आले होते. तिथं शरद पवार गटाचे अमर काळे यांनी बाजी मारली.

परभणी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं आपल्याकडं वळवून परभणीत तिकीट दिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव यांनी लाखांहून अधिक मतांच्या फरकानं जानकरांना आस्मान दाखवलं.

माढा

माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी मोदींची सभा झाली. मात्र, शरद पवारांच्या डावपेचांपुढं मोदींचा करिष्मा चालला नाही. इथं पवारांच्या पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आले.

धाराशिव, लातूर, नंदुरबार आणि अहमदनगर या ठिकाणी देखील नरेंद्र मोदी यांनी जंगी सभा घेतल्या होत्या. मात्र, तिथं विरोधकांचे उमेदवार निवडून आले.

Whats_app_banner