Sanjay rauton Narendra Modi : शिवसेनेचा आज५८वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे पार पडला. यात भाषण करताना संजय राऊतांनी तुफान टोलेबाजी केली. शिंदे गटाचा उल्लेख त्यांनी डोमकावळे असा करत भाजप तसेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) घणाघाती हल्ला केला.
मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे,बहुतेक ही आता देशी ब्रँडी झालीआहे. मोदींना आता राम दिसला असेल, पण रामानी त्यांना लाथ घातली असेल. कारण,त्यांचं हिंदुत्व नकली होतं. अमोल किर्तीकरांची जागा आपण जिंकलो असे म्हणत मुंबईतील ६ पैकी ४ जागा आपण जिंकल्याचा दावा केला. अमोल किर्तीकर यांचा विजय चोरला गेला. तसेच अनेक विजय चोरले. बेईमानी आणि गद्दारीचा स्ट्राईक खाली आणू. देशातली आणि महाराष्ट्रातली सत्ताही आम्ही खाली आणू असा इशाराही राऊत यांनी दिला.
अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात रामाची मूर्ती दिसलीच नाही. फक्त मोदीच दिसत होते.मला वाटत होतं की मंदिरात प्रभू रामाची प्रतिष्ठापणा आहे की मोदींची. आता मोदींना राम दिसला असेल. देशाच्या जनतेने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगी होतं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांसमोर झुकणार नाही हे दाखवून दिलं. मोदी शाह यांचा पराभव अशक्य आहे, मोदी ४०० पार येणार हा असं वातावरण तयार केलं गेलं. जन्माला येतानाच ते ४०० खुळखुळे घेऊन आले असंच चाललं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मोदींचा आणि भाजपाचा खुळखुळा करुन दाखवला, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
भाजपच्या धन्यवाद यात्रेवरही राऊत यांनी हल्ला चढवताना म्हटले की, भाजप धन्यवाद यात्रा काढणार आहे. महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. नरेंद्र मोदींना बहुमतमुक्त केल्याबद्दल. ४०० पार करणार होते पण २४० वर आणून ठेवल्याबद्दल आभार यात्रा काढणार आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. भाजपवाले नशेत आहेत. पण तुम्हाला महाराष्ट्राने नाकरालं आहे.