Manoj Jarange Patil at narayangad dasara melava : बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनोज जरांगे यांनी थेट कोणतंही राजकीय भाष्य करण्याचं किंवा कोणत्याही पक्षाचं वा नेत्याचं नाव घेणं टाळलं. मात्र, अप्रत्यक्षपणे त्यांनी सत्ताधारी भाजप व केंद्रीय मंत्री अमित शहा यांना जोरदार इशारा दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षभरापासून राज्यात मोठा असंतोष आहे. आश्वासनं देऊनही सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर मार्ग न काढल्याची मराठा समाजाची भावना आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता. विधानसभा निवडणुकीतही असंच काहीसं होण्याची चिन्हं आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली होती. 'आंदोलनाची चिंता करू नका. आंदोलनं होतच असतात. त्याचा फार परिणाम होत नाही. नुसत्या आंदोलनानं निवडणुका जिंकता येत नाहीत, असं अमित शहा म्हणाले होते. शहा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत जरांगे पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली.
'काही लोक आपल्याला खुन्नस देतायत. कितीही आंदोलनं करा, कितीही झुंजा, कितीही कोटींच्या संख्येनं एकत्र या. तुमचा आम्ही निर्णय घेणार नाही अशी खुन्नस यांनी आम्हाला दिलीय. ही खुन्नस देणाऱ्यांना उखडून टाकावंच लागणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
> जे सरकार तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतंय, त्या सरकारला संपवल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. - मनोज जरांगे
> आचारसंहिता लागायच्या आत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला खुन्नस देऊन, अपमान करून आमचा घात केला तर तुम्हाला उलटं केल्याशिवाय माघार घेणार नाही - मनोज जरांगे पाटील
> आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला पुढची भूमिका सांगेन. तोपर्यंत विश्वास ठेवा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमची शान वाढवणारच - मनोज जरांगे
> सगळ्या जातीधर्मासाठी झुंजणारा आपलाच एक समाज आहे. हाच समाज सर्वांना न्याय देणार आहे - मनोज जरांगे पाटील
> आपल्याला खुन्नस देतायत. कितीही आंदोलनं करा, किती झुंजा, कितीही कोटींच्या संख्येनं एकत्र या. तुमचा आम्ही निर्णय घेणार नाही अशी खुन्नस यांनी आम्हाला दिलीय. त्यामुळं ह्यांना उखडून टाकावंच लागणार - मनोज जरांगे पाटील
> मराठा, मुस्लिम, शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि बाकीच्यांना वेगळा न्याय का? - मनोज जरांगे पाटील
> माझ्या समाजाला हरू देऊ नका. पक्ष-पक्ष आणि नेता-नेता करू नका - मनोज जरांगे यांचं आवाहन
> जेव्हा आम्ही आरक्षण मागितलं तेव्हा एक जण चॅनेलवर बसून सांगत होता की विरोधातल्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. त्यानं आता उत्तर द्यावं. ह्या १७ जाती आरक्षणात घालताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? - मनोज जरांगे पाटील
> मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातलेत. मला पूर्ण घेरलंय. आरक्षणाची मागणी १४ महिन्यापासून आहे. एकही मागणी मान्य केली नाही. - मनोज जरांगे पाटील
> तुमच्यामुळं आरक्षणाला धक्का लागतोय. आमचं आरक्षण कमी होतंय असं काही जण म्हणत होते. काल परवा १७ मोठ्या जाती आरक्षणात घातल्या. तेव्हा तुम्हाला धक्का लागला नाही. आम्हाला धक्का लागेल म्हणणारा कुठं आहे? - मनोज जरांगे पाटील
> आमची मागणी अन्यायाविरुद्ध आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. - मनोज जरांगे पाटील
> अटकेपर्यंत घुसणारा समाज इतका शांत कसा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण विजय आमचा होणार आहे हा विश्वास आहे म्हणून आम्ही संयम पाळतोय - मनोज जरांगे पाटील
> या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. करोडोंच्या संख्येनं समाज न्यायासाठी लढतोय. सहन करतोय. आमचा मूळ समाज सहन करण्याचा नाही. पण आम्ही सहन करतोय. मूळ स्वभाव फार दिवस लपून राहत नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
> नारायणगडावर मला काही मर्यादा पाळाव्या लागत आहेत. पण न्याय मिळाला नाही तर आपल्याला उलथापालथ करावीच लागेल. आपल्या नाकावर टिच्चून कुठले निर्णय होणार असतील तर आपल्याला शांत बसता येणार नाही - मनोज जरांगे पाटील
> आपला दोष काय हे कोणालाच सांगता येत नाही. आपल्या विरोधात षडयंत्र केलं जातंय. आपल्याला टार्गेट केलं जातंय. - मनोज जरांगे पाटील
> मराठा समाजानं या राज्यासाठी सर्वकाही केलं. माना आमच्या कापल्या गेल्या, न्याय आम्ही दुसऱ्यांना दिला. आम्ही कुणावर अन्याय केला नाही. मग आमच्यावर अन्याय का? आमच्या समाजानं काय पाप केलं?; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल
> नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांचं भाषण सुरू
संबंधित बातम्या