खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकीकडे नितेश राणे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून वारंवार आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत असताना नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे विधानसभेत बंद लिफाफ्यात सादर केले होते. या प्रकरणी तपास सुरु आहे. पण अद्याप त्याबाबत काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यातच नारायण राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्यचे नाव येऊ लागल्यानंतरउद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत असताना व यात आदित्य ठाकरेंचे नाव येऊ लागल्यानंतर आपल्याला उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केला आहे. राणे म्हणाले की, मिलिंद नार्वेकरांनी मला फोन केला होता. त्यांनी सांगितले की,उद्धव ठाकरेंना माझ्याशी बोलायचे आहे. उद्धव मला फोनवर म्हणाले की, आदित्यला सांभाळून घ्या, तुम्हालाही दोन मुले आहेत. यावेळी मी त्यांना तुम्ही तुमच्या मुलाला सायंकाळी सातनंतर घराबाहेर सोडू नका, असा सल्ला दिलेल्याचा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
दिशा सालियन दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर होती व त्याच्या मृत्यूच्या काही दिवसापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घराच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणावरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सालियान प्रकरणाला वेगळं वळण लागलं. याच प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोन आला होता,असा मोठा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
राणे कुटुंबीय अधून मधून दिशा सालियनचा विषय काढून आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राजकोट किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे आणि नारायण राणे आमने सामने आले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.