बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर शालेय मुली तसेच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता नंदुरबारही बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना शाळेने लपवल्याचा आरोप होत आहे.
या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शाळा प्रशासनानेही आरोपी कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ केलं आहे. बदलापूरची घटना ताजी असतानाच घडलेल्या या घटनेमुळे नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता वाढली आहे.
आरोपी कंत्राटी पद्धतीने शाळेत कामावर होता. त्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सफाई कामगाराने शाळा सुटल्यानंतर मुलीला एकांतात भेटायला बोलवलं होतं. मुलगी आल्यानंतर त्याने तिला आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला. या घटनेविषयी पीडितेने आपल्या पालकांना सांगिते. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेकडून त्या सफाई कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
प्रकार शाळेने लपवल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून शाळेचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. दोषी आढळल्यास शाळेवर देखील होणार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता आणखी एक घटना बदलापूरमध्ये उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका १५ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात देखील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.