Nandurbar news : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडवल्या. नेत्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अनेक आश्वासनं आणि घोषणा केल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षात पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने एका महिलेचा गर्भपात झाला आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे. येथे एका महिलेला पाच महिन्यातच प्रसूतिकळा सुरू झाल्या. मात्र, रस्ता नसल्याने बांबूची झोळी करून तिला तिच्या नातेवाइकांनी दवाखान्यात नेले. मात्र, वेळेत दवाखान्यात पोहोचता आले नसल्याने तिचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंच्याती अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडामधील एका गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दुखू लागले. तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. मात्र, तिच्या पाड्यावर रस्ताच नसल्याने तिच्या नातेवाइकांनी बांबूची झोळी करून या महिलेला तब्बल साडेआठ किलोमीटर पर्यंत मुख्य रस्त्यावर आणले. मात्र, या भागात रुग्णवाहिकाही देखील नसल्याने एका खासगी वाहनातून या माहीलेला पिंपळखुटाच्या रुग्णालयात नेण्यात आलंन. मात्र, खराब रस्ता असल्याने एका पाणी साचलेल्या भागात या महिलेची गाडी अडकून पडली. हे वाहन यातून बाहेर काढण्यासाठी मोठा वेळ गेला. यामुळे वेळेत महिला दवाखान्यात न पोहोचल्याने या महीलेचा गर्भपात झाला.
नंदुरबार जिल्ह्यात आजही अनेक गावे ही मुख्यरस्त्याला जोडली गेली नाही. अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने त्यांना पायपीट करावी लागते. तर जे रस्ते आहेत ते देखील नादुरुस्त आहेत. या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करून देत असते. मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जातो. त्यामुळे पावसाळा व हिवाळ्यात रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करण्याची वेळ दरवर्षी येथे.
महिलेचा गर्भपात झाल्याने महिला मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिला पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा गर्भपात झाला असला, तरी या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
नंदुरबार हा राज्यातील दुर्गम जिल्हा आहे. या ठिकाणी आदिवासींची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यातील अनेक गाव वाड्या वस्त्या या दुर्गम डोंगरी भागात वसलेल्या आहेत. या ठिकाणी रस्ते नाहीत. पायाभूत सुविधा देखील नाहीत. त्यामुळे एखादा व्यक्ति आजारी पडला की नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ येते. यापूर्वी देखील रस्ता, रुग्णवाहिका नसल्याने नागरिकांच्या जिवावर बेतले आहे. रस्ता व रुग्णवाहिका नसल्याने महिलेचा गर्भपात झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.