Congress MLA Car Attack : नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे एका गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले असतांना त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात ते बचावले आहे. ही घटना शुक्रवरी रात्री ११ च्या सुमारास पुंड पिंपळगाव येथे घडली. यामुळे तानावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात मोहन हंबर्डे हे बचावले आहेत. दरम्यान, आंदोलकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोहन हंबर्डे हे नांदेड तालुक्यातील पुंड पिंपळगाव येथे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ते रात्री १०.३० दरम्यान, गावात पोहचले. यावेळी ते गावात येताच मराठा आंदोलकांनी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत त्यांना गावात येण्यास विरोध केला. काही आंदोलक संतप्त झाले होते.
त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगड फेक केली. यात हंबर्डे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यांनी आंदोलकांची चर्चा करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. काही महिन्यांपूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती.
मराठा आंदोलकांनी हिंगोली महामार्गावरील निळा रोड फाटा येथे देखील महामार्ग रोखून धरला होता. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील किमान दहा गावातील नागरिक इथे जमा झाले होते. सकाळपासून याठिकाणी आंदोलन सुरू होते. शुक्रवारी रात्री १० वाजता देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.