Nanded Accident: नांदेडच्या माहूर तालुक्यात आज धक्कादायक घटना घडली. बारावीचा पेपर सोडवून आपल्या घराकडे जाताना विद्यार्थ्यांची दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक लेंडे आणि कृष्णा बोंतावार असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, गणेश तोटावार असे रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहेत. हे विद्यार्थी दहेली तांडा येथील स्व. संगीताबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होते. तर, अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात बारावीची परीक्षा देण्यासाठी जात होते. २ मार्च सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान पेपर सोडवून घरी परतताना त्यांची दुचाकी झाडाला धडकली.
या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने खाजगी वाहनाद्वारे जखमींना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेले. त्यानंतर तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात हलवले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी प्रतिक लेंडे आणि कृष्णा बोंतावार यांना मृत घोषित केले. तर, गणेशला रुग्णालयात दाखल करून घेतले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या