राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या पद्धतीनं टीका करत आहेत, त्यावरून त्यांच्याबाबत असलेला संभ्रम दूर होतो. मात्र त्यांच्या अजित पवारांशी लपून-छपून ज्या भेटी सुरू आहेत, त्यावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतअसल्याचंनाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढच्या आठवड्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ ची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. पाटणा व बंगळुरूनंतर इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होत असून याची जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीला जवळपास सर्वच विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमधून एक चांगला मेसेज केंद्र सरकारला जाणार आहे. त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल, असं पटोले यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतआहे.
अजित पवार गटावर निशाणा साधताना पटोले म्हणाले की, सरकारमध्ये सहभागी होताना विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं गेलं. मात्र आता कांदा प्रश्नांवरून ते स्वतःचा विकास करायला गेले हे सिद्ध झालं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. खराब होणाऱ्या कांद्यासाठी केंद्र सरकार जबाबदार राहणार का? असा सवालही यावेळी पटोले यांनी उपस्थित केला आहे.