Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. परंतु, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले. विधानसभा निवडणुकीत मिळालेला पराभव महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, नाना पटोले यांनी असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. मात्र, आता नाना पटोले यांनी स्वत:च राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. 'मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली आहेत. आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नव्या कमिटीची स्थापना करावी. तसेच मला पदावरून मुक्त करा', अशा आशयाचे नाना पटोले यांनी पत्रात लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे नाना पटोले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन केली. नाना पटोले यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला भेट देऊ ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी लोट पेपरवर मतदान घेत असल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत इतका मोठा बदल कसा होऊ शकतो, असा संशय महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला. तसेच यासंदर्भात चौकशी व्हावी, अशीही अनेकांनी मागणी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला. तर, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (काँग्रेस- १३, ठाकरे गट- ९, शरद पवार गट-८) ३० जागा जिंकल्या होत्या. तर, महायुतीला १७ (भाजप-९, शिंदे गट-७, अजित पवार गट-१) जागेवर विजय मिळवता आल्या होत्या.
संबंधित बातम्या