राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून नंदुरबारनंतर आज धुळ्यात जंगी सभा पार पडली. त्याआधी राहुल गांधींनी नाशिक दौरा करत मंदिराचे दर्शन घेतले. धुळ्यातील सभेत राहुल गांधींचा तिरंगी रंगाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी राहुल गांधींना विठ्ठलाची मूर्ती देण्यात आली. मात्र राहुल यांनी ती मूर्ती नाकारल्याचा प्रचार करत भाजपच्या आयटी सेलकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. त्याला अप्रचार व चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.
धुळ्यातील सभेदरम्यान राहुल गांधींना अनेकांनी भेटवस्तू दिल्या. एकाने त्यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला. मात्र संबंधित व्यक्तीला स्टेजवरून हटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, भाजपच्या आयची सेलवाल्यांकडून अर्धवट व्हिडिओ शेअर करत राहुल गांधीबद्दल अपप्रचार केल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुनही राहुल गांधींचा तो व्हिडिओ शेअर करण्यात आला.
विठु माऊलीचा करुनिया अपमान
थाटतोय हा मोहब्बतचं दुकान... अशी टीका करण्यात आली होती. त्यास काँग्रेसने उत्तर दिलं आहे.
पटोले यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत, म्हटलं आहे की, भाजपाच्या ४० पैसेवाल्या आयटीसेलवाल्यांकडून हा अपप्रचार होत आहे.
धरीला पंढरीचा चोर| गळा बांधुनिया दोर||
हृदय बंदिखाना केला| आंत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी| विठ्ठल पायी घातली बेडी
सोहम शब्दाचा मारा केला| विठ्ठल काकुळती आला
आम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी... ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून-मोडून सादर करायचा, यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं ४० पैसे आयटी सेल धन्यता मानतं. राहुलजी यांनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मानसन्मान त्यांना मिळाला, तो सर्व स्वीकारला, असे म्हणत नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.
नाना पटोले यांनी म्हटले की, राहुल गांधींचा हा व्हिडिओ भाजपच्या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देव बाटवला आहे. देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही. पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं, समाजात फुट पाडणं, हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपला, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या