Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

Nov 28, 2024 06:07 PM IST

Nana Patole On Voting Persent :राज्यात मतदानाची वेळ संपल्यानंतर एकूण मतदानात ७.८३ टक्के वाढझाली असूनतब्बल ७६ लाख मतांची ही वाढनेमकी कशी झाली? असासवालनाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल
काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय झाला असून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला इतकं बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. त्य़ाचबरोबर मतदान प्रक्रियेवरही शंका उपस्थित केल्या जात आहे. यानंतरआता देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाली असूनतब्बल ७६ लाख मतांची ही वाढनेमकी कशी झाली? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. त्याचबरोबर जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान नाना पटोले यांनी आयोगाला दिले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक मुंबईतील टिळक भवनात पार पडली.  या बैठकीनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी मतांची आकडेवारीसमोर आणत, आयोगाच्या भोंगळ कारभारावर सवाल उपस्थित केले. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदार केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज समोर आणावे, असे आव्हाननाना पटोले यांनी दिले आहे.

निवडणूक आयोग मतदान संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मतदानाची संपूर्ण आकडेवारी जाहीर करत असते, मात्र यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढलेल्या मतांबाबत तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली असून यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नाना पटोले म्हणाले की, राज्य विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

Whats_app_banner