Nana Patole : ‘अदानी पवारांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला त्याचं काही वाटणार नाही’
Nana Patole : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्योगपती गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar - Gautam Adani Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित आर्थिक संबंधांवरून काँग्रेसनं देशभरात आघाडी उघडली असताना काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अदानींशी सौहार्दाचे संबंध राखून आहेत. गेल्या काही दिवसांत दोन वेळा शरद पवार व अदानी यांची भेट झाली आहे. काल झालेल्या ताज्या भेटीवर काँग्रेस नेते नाना पटोले सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईतील टिळक भवनात होत असलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकांच्या पार्श्वभूमीवर पटोले पत्रकारांशी बोलत होते. अदानी-पवार यांच्या भेटीबद्दल त्यांनी थेट मत मांडलं. 'शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे नाहीत, त्यांचा पक्ष वेगळा आहे. आम्ही भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलो आहोत. कुणालाही कुठल्याही गोष्टीची बळजबरी करता येत नाही. त्यांना कोणत्या विचारायचं समर्थन करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असं पटोले म्हणाले.
'कोण कोणाला भेटतो याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. अदानी पवारांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला त्याचा विरोध करण्याचं कारण नाही. ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नाही. अदानी व काँग्रेसची वयैक्तिक दुश्मनी नाही. परंतु आमचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं पटोले म्हणाले.
'मोदी-अदानी यांचा संबंध काय? आणि अदानीच्या कंपनीत २० हजार कोटी रुपये कुठून आले? सर्व कंपन्या अदानीलाच का विकल्या जात आहेत? अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी ही काँग्रेसची मागणी कायम आहे. मोदी सरकार ही मागणी मान्य का करत नाही? हा जनतेच्या पैशाचा प्रश्न आहे म्हणून काँग्रेस जाब विचारत राहणार, कोणाला व्यक्तिगत संबंध ठेवायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही पटोले यांनी नमूद केलं.