Nana Patole on Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांना महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू-मैं मैं सुरू आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांवर टीका केली असून त्यांनी आता नौटंकी थांबवावी तसेच मर्यादा पाळावी आणि लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करुने थांबवावे असे उत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
संजय राऊत यांनी शनिवारी झालेल्या एका सभेत कॉँग्रेसवर टीका केली होती. यावेळी संजय राऊत यांनी सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण राज्यात त्यांची कोंडी करू, असे वक्तव्य केले होते. यातून त्यांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील व काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधतांना म्हटले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर देतांना म्हणाले, देशात लोकशाहीच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या विरोधात आम्ही लढत आहोत. भाजप सत्येत यायला नको, यासाठी सर्व परिणाम भोगायला तयार असून आमची भूमिका देखील स्पष्ट आहे. असे असतांना त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करणे म्हणजे न पटण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांनी आता सुधारणा करणे गरजेचे आहे. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका असून एखाद्या मोठ्या नेत्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. संजय राऊतांनी आता नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये. दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू असे देखील पटोले म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या बद्दल बोलतांना पटोले म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये जाईल असे वाटत नाही. खडसे स्वाभिमानी नेते आहे, त्यांचा भाजपमध्ये ज्याप्रकारे छळ झाला, तो पाहता ते परत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतील असे वाटत नाही. एकनाथ शिंदे मात्र भाजपच्या वाटेवर आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.