मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Winter Session : विधानसभेत अमृता फडणवीस व सुनेत्रा पवारांचा उल्लेख, अजित पवार-फडणवीसांमध्ये टोलेबाजी

Winter Session : विधानसभेत अमृता फडणवीस व सुनेत्रा पवारांचा उल्लेख, अजित पवार-फडणवीसांमध्ये टोलेबाजी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 29, 2022 05:25 PM IST

assembly winter session : हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींवर जोरदार टोलेबाजी केली.

अजित पवार-फडणवीसांमध्ये टोलेबाजी
अजित पवार-फडणवीसांमध्ये टोलेबाजी

नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा (Nagpur winter session ) सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील व बँकाच्या स्थितीबद्दल चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर फडणवीसांनी उत्तर दिलं. अजितदादा म्हणाले की अमृताशी बोला पण दादा तुम्ही हे बोलताना सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा मिश्कील प्रश्न फडणवीसांनी अजित पवारांना विचारला. राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नसल्यामुळे अजित पवारांनी थेट अमृता फडणवीसांचं नाव घेतलं होतं. मी याबाबत अमृता वहिनींशीच बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचं भाषण मी अनेकदा ऐकलं आहे. मात्र यावेळीचं भाषण जयंतरावांनी लिहून दिल्यासारखं वाटलं. जयंतराव बाहेर आहेत त्यामुळे त्यांचं भाषण पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  अजित पवारांचं भाषण कायमच रोखठोक असतं. पण त्यांचं या वेळचं भाषण १०० टक्के अजित पवारांचं वाटत नव्हतं.  त्यातील ५० टक्के मुद्दे जयंत पाटलांचेही वाटत होते. असा टोला फडणवीस यांनी लगावला.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांचं कामकाज सुरू आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देत, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य केलं. 

फडणवीस म्हणाले की, अजित दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, किती झाले वगैरे.. पण दादा एका गोष्टीचे दु:ख आहे, तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही पवारसाहेबांनी तुमची संधी हिरावून घेतली. २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री न करता काँग्रेसला संधी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दादा म्हणतात शेतकऱ्यांच्या वीज न तोडण्याचा जीआर मिळाला नाही. तो जीआर मी ट्वीट केला, फेसबुकवर टाकला, सर्वांना पाठवलाही, त्यामुळे दादा आता तुम्ही मला ट्विटरवर फॉलो करा, अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावली. ते विरोधी पक्षनेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतो, असंही फडणवीस म्हणाले. 

IPL_Entry_Point