Nitin Gadkari Viral Video: पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये नितीन गडकरी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देत आहेत. मात्र, ही पोस्ट बनावट असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले असून याप्रकरणी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत. नागपूर पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली असून मा. गडकरीजी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे, अशा आशयाचे ट्वीट नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कसबा पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रंवीद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला आहे. विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली. मविआच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.