Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर-उमरेड मार्गावर भिवापूरजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात (Nagpur Accident News) झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण जखमी झाले. मृत व जखमींची नावे कळू शकलेली नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार माँ दुर्गा नामक खासगी ट्रॅव्हल्स बस (एम.एच. ४९ जे. ८६१६) नागपूर येथून भिवापूरकडे भरधाव वेगात येत होती. दरम्यान, शहरालगतच्या तास शिवारातील बस थांबा परिसरात असलेल्या पाणटपरी शेजारी रेशनचे धान्य भरलेला (एम.एच. ३१ ए.पी. २९६६) हा ट्रक थांबलेला होता. दरम्यान, भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकसह पाणटपरीला धडक देत थेट शेतात घुसली. यात ट्रॅव्हल्समधील एक महिला, एक मुलगा व दोन पुरुष असे चौघे बसच्या खाली गेले. यापैकी दौघांच्या शरीरावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर दोन जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅव्हल्सखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी १० प्रवाशांना नागपूरला हलविण्यात आले आहे.
बस इतक्या वेगात ट्रकवर आदळली की, ट्रॅव्हलच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. बसची समोरची दोन चाकेही निखळली होती. मृतांमध्ये भिवापूर व उमरेड येथील प्रत्येकी एक, तर कन्हाळगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील एकाचा समावेश आहे. अन्य एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातामुळे नागपूर -उमरेड मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर माहिती कळताच परिसरातील तसेच आजूबाजुच्या गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस व रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर रुग्णांना नागपूरला हलवले आहे.
मालाड परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने २६ वर्षीय तरुणीला मागून जोरदार धडक दिल्याने ती चाकाखाली चिरडून ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत घाटकोपर पूर्व भागात छेडा नगर जंक्शन येथे एका ८० वर्षीय वृद्धेला महिलेला क्रेनने चिरडले आहे.
मालाडमध्ये मेंदी आर्टिस्ट म्हणून काम करणारी शहाना इक्बाल काझी (वय २६) ही तरुणी आपलं काम संपवून रात्री दहाच्या सुमारास मालाड मेट्रो स्थानकावरून घरी परत चालली होती. तेवढ्यात लिंक रोडवरील ऑरिस बिल्डिंग कॉम्प्लेक्सजवळ फोर्ड एंडेव्हर कारने तिला जोरदार धडक दिली.