School Bus Accident: सहलीला जाताना काळाचा घाला; नागपूरमध्ये स्कूल बसला भीषण अपघात, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू , १० जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  School Bus Accident: सहलीला जाताना काळाचा घाला; नागपूरमध्ये स्कूल बसला भीषण अपघात, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू , १० जखमी

School Bus Accident: सहलीला जाताना काळाचा घाला; नागपूरमध्ये स्कूल बसला भीषण अपघात, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू , १० जखमी

Nov 26, 2024 02:03 PM IST

Nagpur School Bus Accident : अपघातग्रस्त बसमध्ये५२विद्यार्थी प्रवास करीत होते. यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती आहे.

नागपूरमध्ये स्कूल बसला अपघात
नागपूरमध्ये स्कूल बसला अपघात

नागपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५२  विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढून उपचारासाठी नागपूरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती मार्गावरील देवरी-पेंढरी गावाजवळ आज (मंगळवार) सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. अपघात झालेल्या या बसमध्ये नागपूर येथील सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी खासगी शाळेतील विद्यार्थी घराबाहेर पडली. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत अमरावती रोडवरील देवरी-पेंढरी गावाजवळ बस येताचच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याकडेला उलटली. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर अनेक विद्य़ार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी पोहोचले आणि सर्व जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमध्ये ५२ विद्यार्थी प्रवास करीत होते. यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती आहे. वर्ध्यात ट्रेंनिगसाठी हे विद्यार्थी गेले होते. वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना हा अपघात झाला. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला. सकाळी ५ बसेसमधून विद्यार्थी नागपूरकडे परतत होते. चार बस पुढे निघाल्या, तर शेवटच्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली. ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले.

देवळी परिसरात बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पालकांनी नागपूरमधील एम्स रुग्णालयात धाव घेतली. अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहचले. आपापल्या पाल्यांच्या सुखरुपतेची चौकशी पालक शिक्षकांकडे करत होते. यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर