Nagpur Rain: नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Rain: नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Nagpur Rain: नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Published Jul 20, 2024 10:44 AM IST

Nagpur Rain Update: नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nagpur Rain Update Heavy rains
Nagpur Rain Update Heavy rains (PTI)

Nagpur Rain Update: भारतीय हवामान विभागाने नागपूरसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २० जुलै रोजी नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. आता नागपूर मधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागपूर जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने अर्थात आयएमडीने नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे.

नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. तसेच, स्वतःच्या रक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने विदर्भात हजेरी लावली असून, नागपूरसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विदर्भात मोसमी पाऊस परतला!

ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गावातील नदी नाले भरण्याच्या मार्गावर आहेत. तर काही ठिकाणी वीजपुरवठा देखील ठप्प झाला आहे. मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. वर्धा जिल्ह्यात देखील गुरुवारी पेंढरी आणि आजूबाजूच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. दरम्यान, सकाळपासूनच विदर्भात सगळीकडे पावसाचा जोर कायम आहे.

Local Train Update: मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत; मध्य आणि हार्बरसह पश्चिम रेल्वे देखील उशीरा!

नागपूरच्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला आहे. तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठे हलक्या, तर कुठं जोरदार सरी बरसत आहेत. पहाटेच्या सुमारास या पावसाने चांगलाच जोर पकडला. या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागात पावसाचं पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर